कसा करावा प्रथमोपचार, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

विजेचा शॉक

  • विजेची उपकरणे, विजेच्या तारा, प्लग पॉइंटस इत्यादीचा काळजीपूर्वक वापर करावा.
  • विजेचा शॉक बसलेला असेल तर वेळ न घालवता, त्या व्यक्तीला स्पर्श करण्यापूर्वी ताबडतोब वीजपुरवठा करणारा मेन स्विच बंद करावा.
  •  जर त्याला अस्वस्थ वाटत असेल तर त्या रुग्णाला लगेच रुग्णालयात न्यावे.

भाजणे

  • भाजलेल्या भागावर खूप जास्त प्रमाणात थंड व स्वच्छ पाणी ओतावे म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबेल व तो भाग थंड राहील. शक्यतो १५ मिनिटे भाजलेला अवयव थंड पाण्याखाली धरा.
  • भाजलेल्या ठिकाणी काही चिकटले असेल तर ते काढू नये.
  • जर एखाद्या व्यक्तीच्या कपडयांनी पेट घेतला असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला ब्लॅँकेटमध्ये गुंडाळावे.
  • भाजलेल्या व्यक्तीला भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ द्यावेत. वेदना शांत करणारे औषध वापरावे व त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा.

रक्तप्रवाह

जखम लहान असली तरी त्यातून रक्त येतेच. जास्त रक्तप्रवाह होत असल्यास जखमेवर हात घट्ट दाबून ठेवा. जखमी अवयव वर उचलून धरा. मग जखमेला ड्रेसिंग करा.

रस्त्यावरील अपघात

  • नेहमी रस्त्याच्या बाजूने वाहतुकीकडे तोंड करून चालावे. रस्ता ओलांडताना नेहमी पादचाऱ्यांसाठी असलेल्या पट्ट्यांचा उपयोग करावा.
  • अपघात जर डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला इजा झाली असेल तर डोके किंवा मान हलवू नका.
  • खरचटले किंवा मुरगळले असेल तर तो भाग थंड पाण्यात बुडवा.
  • अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीला वेदना होत असतील तर तिचे हाड मोडलेले असेल तर इजा झालेला भाग हलवू नका. ताबडतोब त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे न्या.

लचकणे, मुरगळणे

  • शरीराच्या लचक भरलेल्या भागाला आराम मिळेल अशा पद्धतीने स्थितीत ठेवा.
  • लचकल्यामुळे सूजेवर बर्फाने दर तीन तासांनी शेक द्या. त्यामुळे दुखणे कमी व्हायला मदत होईल.
  • बँडेजने लचकलेला अवयव घट्ट बांधा.
  • मुरगळलेला पाय दोन उशांवर ठेवून पायाला शक्य तेवढी विश्रांती द्यावी. पायाला बांधण्याचे बँडेजदेखील पायाला बांधून बरे वाटते. हे बँडेज पायाच्या बोटांपासून वर बांधावे.

गुदमरणे

  • कुणी चुकून काही गिळलेले असेल आणि तो खोकत असेल तर त्यात अडथळा आणू नका. त्याला ती वस्तू ओकून बाहेर काढू द्या. जर ती वस्तू पटकन बाहेर आली नाही तर ती त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
  • चेहरा खालच्या बाजूने वळवा व डोके पायाच्या खालच्या पातळीत असू द्या. पाठीवर बुक्के मारून ती वस्तू बाहेर काढायचा प्रयत्न करा.