पहिले अखिल मराठा संमेलन 25 ऑगस्टला ठाण्यात, शंभर मराठा संस्था एकवटणार

1249

मराठा समाजातील लोकांच्या उन्नतीसाठी देशभरात मराठा समाज बांधव विविध संस्थांच्या माध्यमातून काम करत असलेल्या  देशभरातील जवळपास शंभर संस्थांचे प्रतिनिधी 25 ऑगस्टला पहिल्या अखिल मराठा संमेलनाच्या निमित्ताने ठाणे येथे एकत्र येणार आहेत. अखिल मराठा फेडरेशन व मराठा मंडळ, ठाणे यांनी या संमेलनाचे आयोजन केले असून नोकरी, स्पर्धा परीक्षा, उद्योग याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

आर्थिक विकासाबरोबरच आपली संस्कृती टिकविण्याचे काम करणाऱया विविध मराठा समाज बांधव संस्था अखिल मराठा संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. 25 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाटय़गृहात दुपारी 3.30 ते रात्री 10 या वेळेत हे संमेलन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम उपक्रम व ठाण्याचे पालकमंत्री या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री आशीष शेलार, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे,  डॉ. श्रीकांत शिंदे,  संभाजीराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, उद्योजक अमित हावरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थी व तरुणांसाठी करीयर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. यामध्ये सैन्यदल, वायुदल व नौदल क्षेत्रातील संधीबाबत जनरल विजय पवार मार्गदर्शन करणार आहेत. एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांबाबत मधुकर कोकाटे (माजी अध्यक्ष एमपीएससी) तर उद्योजकता या विषयावर प्रा.नामदेवराव जाधव (लेखक, शिवाजी द मॅनेजमेंट गुरू) हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱया सत्रात मराठा संस्थांचे वैचारिक अधिवेशन होईल. तिसऱया सत्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी योगदान देणार्‍यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अखिल मराठा फेडरेशनचे सरचिटणीस राजेंद्र साळवी यांनी दिली आहे.

जमा होणारा निधी पूरग्रस्तांना

संमेलनात नामवंत लेखकांचे साहित्य आणि प्रकाशनांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पुस्तकविक्री आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमा होणारा निधी पूरग्रस्तांच्या मतदीसाठी दिला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या