वरळी बीडीडीवासीयांची मोठ्या घराची स्वप्नपूर्ती; 556 रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या, आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाची केली पाहणी

वर्षानुवर्षे 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया वरळी बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान मोठय़ा घराचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील डी आणि ई या दोन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून 556 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन ‘ई’ विंगची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंत्यांशी चर्चा करून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील एकूण 8 विंगपैकी डी आणि ई या दोन इमारतींना ओसी मिळाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई, आमदार अजय चौधरी, अनंत (बाळा) नर, हारून खान, संजय पोतनीस, महेश सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव नव्या घरात!

बीडीडी चाळ पहिला टप्पा पूर्ण झाला असून 556 घरे बांधून तयार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांना तातडीने घराच्या चाव्या देऊन त्यांचे गणेशोत्सव नव्या घरात साजरा करण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश

शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता.

डिसेंबरपर्यंत वरळी बीडीडी चाळीतील 1690, नायगाव बीडीडी चाळीतील 1400 आणि ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 342 रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.