आमीर खान का म्हणतोय ‘सत श्री अकाल’? वाचा….

612

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमीर खान सध्या बराच काळ बॉलिवूडच्या पडद्यापासून दूर आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ तिकीटबारीवर दणकून आपटला होता. बिग बजेट चित्रपटाचे 2018च्या ऐन दिवाळीत फटाके वाजल्यानंतर त्याने काही काळ शांत बसणंच पसंत केलं होतं. पण, आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी लांब दाढी, डोक्यावर शीख पगडी अशा वेशातल्या आमीरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजत होता. कारण, ‘गझनी’पासून सुरू झालेली त्याच्या विविध लूक्सची चर्चा. आपल्या आगामी चित्रपटासाठी केसांपासून ते शरीरयष्टीपर्यंत सगळ्यावर जीवतोड मेहनत करणाऱ्या आमीरचा लूक बदललेला दिसला कीच त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होते. तसंच काहीसं या फोटोबाबतीतही झालं होतं. या फोटोत दिसणारा आमीरचा लूक त्याच्या आगामी लाल सिंग चढ्ढा या चित्रपटासाठी असल्याचंही उघड झालं होतं.

त्याच लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्विटरवर आपला लाल सिंगच्या रुपातला फोटो शेअर करून त्याखाली आमीरने ‘सत श्री अकाल जी, मैं लाल… लाल सिंग चढ्ढा’ अशी कॅप्शनही दिली आहे. प्रेक्षकांना त्याचा हा लूक खूप आवडला असून ते त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. राजकारण, प्रेम, इतिहास, खेळ, युद्ध अशा अनेक भावभावनांचे ते मिश्रण असल्यानेच आमीरने ही कथा निवडल्याचं बोललं जात आहे. आमीरसोबत या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरही झळकणार आहे. तिचा या चित्रपटातील लूकही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या चित्रपटातील अन्य कलाकार कोण असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 2020च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या