पहिले राफेल 20 सप्टेंबरला हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात

423
rafale-modi

हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताकदीत मोठी वाढ करू शकणाऱ्या 36 हायटेक राफेल विमानातील पहिले विमान येत्या 20 सप्टेंबरला हिंदुस्थानच्या हवाली केले जाणार आहे. जी-7 देशांच्या शिखर परिषदेसाठी हिंदुस्थानी पंतप्रधान फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या परिषदेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रोन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मॅक्रोन यांनीच या निर्णयाची माहिती दिली.

फ्रान्स सरकार राफेल विमानांची आणखी दोन स्क्वॉड्रन्स म्हणजे 36 राफेल विमाने हिंदुस्थानी हवाई दलाला तत्काळ विकणार असल्यामुळे हिंदुस्थानची हवाई दलाची ताकद प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. फ्रान्सकडून मिळणारी 36 राफेल विमाने ठेवण्यासाठी लागणारी पुरेशी जागाही हिंदुस्थानकडे दोन एअरबेसवर उपलब्ध करण्यात आल्याचे गुरुवारीच हिंदुस्थानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

राफेलचा ताबा घेण्यासाठी संरक्षणमंत्री, हवाई दलप्रमुख उपस्थित राहणार
या विमानांचा ताबा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ उपस्थित राहणार आहेत. या विमानांचा हवाई दलात समावेश करून घेतल्यानंतर त्यांचा तत्काळ वापर करता यावा यासाठी 24 वैमानिकांना काही महिन्यांपासूनच प्रशिक्षण दिले जात आहे.

हिंदुस्थानात आता टेम्पररी काहीच नाही
हिंदुस्थानात आता टेम्पररीला अजिबात स्थान नाही. हे टेम्पररी हटवण्यासाठी 70 वर्षे लागली. यावर हसू की रडू हेच कळत नाही. आमच्या सरकारने केवळ 75 दिवसांत हा महत्त्वाचा निर्णय घेतला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीरवरून विरोधकांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला. फ्रान्स दौऱयादरम्यान पॅरिसमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांशी त्यांनी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही यांना आमच्या कार्यकाळातच लगाम घालण्यात आला, असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या