स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गावातील मुलगा दहावी पास

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिह्यातील दुर्गम गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विद्यार्थी दहावी पास झाला आहे. या मुलाचे नाव रामकेवल असून तो निझामपूर गावचा रहिवाशी आहे. दिवसभर काम आणि रात्री दिव्याच्या उजेडात अभ्यास असा संघर्ष करत त्याने हे यश मिळवले आणि गावातील अन्य मुलांसमोर नवा आदर्श ठेवला.

जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी रामकेवल आणि त्याच्या आईवडीलांचा सत्कार केला. यावेळी गरीब पुटुंबातील रामकेवलने आपली कहाणी सांगितली. तो म्हणाला, मी लग्नाच्या वरातीत डोक्यावर दिवे घेऊन चालायचे काम करतो. या कामाचे मला अडीचशे ते तीनशे रुपये मिळतात. काम करून घरी आल्यावर मध्यरात्री दोन तास तरी अभ्यास करायचो. गावातील काही माणसं खिल्ली उडवायचे. तू कधीही पास होणार नाहीस, असे चिडवायचे. मात्र मी त्यांचे म्हणणे खोटे ठरवले.

निझामपूर गाव बाराबंकीपासून 30 किलोमीटर अंतरावर असून गावची लोकसंख्या जेमतेम 300 आहे. रामकेवल हा चार भावंडांमध्ये सर्वात मोठा. रामकेवल सध्या अहमदपूर येथील गव्हर्नमेंट इंटरकॉलेजमध्ये शिकत आहे. इंजिनियर व्हायचे त्याचे स्वप्न आहे. तो वर्गातील हुशार मेहनती मुलगा असल्याचे सांगत शिक्षकांनी त्याचे कौतुक केले. रामकेवलची आई पुष्पा गावातील शाळेत जेवण बनवायचे काम करतात. जेमतेम पाचवी शिकलेल्या पुष्पा यांना आपल्या मुलांनी चांगले शिकावे असे वाटते.