आधी हल्ल्याची भीती; आता पाहुणचाराची धास्ती! अहिल्यानगरमधील 927 गावांत बिबट्यांचा वावर

बिबटय़ाचे मानवी वस्तीमध्ये वाढलेल्या हल्ल्यामुळे आधीच वन विभाग बेजार झाला आहे. जिह्यातील 927 गावांमध्ये बिबट्यांचे अस्तित्व असून, वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये 40 बिबटे अडकले आहेत. जुन्नर (जि. पुणे) येथील बिबटय़ा बचाव केंद्रामध्ये (रेस्क्यू सेंटर) क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असल्याने जिह्यात पकडलेल्या बिबट्यांना घेतले जात नाही. यामुळे वन विभागाच्या विविध रोपवाटिकांमध्ये 40 बिबटे सध्या सरकारी पाहुणचार घेत आहेत. यामुळे आधी बिबटय़ांच्या हल्ल्यांची भीती; आता पाहुणचाराची धास्ती, अशी वन विभागाची अवस्था झाली आहे.

अहिल्यानगर जिह्यात डिसेंबर महिन्यात 18 पेक्षा अधिक बिबटे जेरबंद झाले आहेत. सद्यस्थितीत जखमी आणि इतर असे 40 बिबटे जिह्यातील वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये पाहुणचार घेत आहेत. हे बिबटे पिंजऱ्यात असल्याने नवीन मोहिमांसाठी पिंजरेही अपुरे पडत आहेत. या बिबटय़ांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि त्यांना ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याने त्यांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापि परवानगी मिळालेली नाही. अकोले, राहुरी, संगमनेर यांसह विविध क्षेत्रीय स्तरांवरील रोपवाटिकांमधील पिंजऱ्यात बिबटे बंद आहेत. या बिबटय़ांना पुन्हा निसर्गात न सोडता, इतर बचाव केंद्रांमध्ये पाठवण्याची परवानगी वन विभागाने मागितली होती.

बिबटय़ांच्या खाद्याचा वाढता खर्च आणि सुरक्षेचा प्रश्न वन विभागासमोर उभा आहे. जिह्यात गेल्या महिनाभरापासून दर दोन दिवसाला एक ते दोन बिबटे जेरबंद होत आहेत. बिबटय़ांच्या हल्ल्यांचे प्रमाणही अद्यापि कमी झालेले नाही. त्यामुळे पकडलेले बिबटे पिंजऱ्यातच ठेवण्याची वेळ आली आहे. विभागात 600 पिंजरे उपलब्ध असले, तरी 970 गावांमध्ये बिबटय़ांचा वावर आहे. रेस्क्यू सेंटर नसल्याने बिबटय़ांना पिंजऱ्यातच ठेवले जात आहे. पकडलेल्या बिबटय़ांबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठविलेली आहे. त्यांच्या स्थलांतराबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून घेतलेल्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बिबट्यांचे ड्रोन सर्व्हेक्षण करा

मांजरसुंबा, डोंगरगण, जेऊर, चापेवाडी, टाकळी, खातगाव, जखणगाव, हिंगणगाव नेप्ती, निमगाव वाघा, इसळक, निंबळक, खारे कर्जुने, निमगाव घाणा, दहावा मैल, हमीदपूर या गावांत बिबटय़ांचा जास्त वावर असल्याचे बोलले जात आहे. नगरच्या पश्चिम पट्टय़ामध्ये वन विभागाने तातडीने ड्रोन सर्वेक्षण करून बिबटय़ांची संख्या निश्चित करावी व त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी टाकळी खातगावचे सरपंच सुनीता नरवडे, सुनील नरवडे, राजाराम नरवडे, सुदाम शिंदे, मच्छिंद्र जाधव यांनी केली आहे.

शेतात मजूर येईनात

अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा, डोंगरगण, जेऊर, इसळक, निंबळक, खारे कर्जुने, टाकळी खातगाव, नेप्ती, हिंगणगाव, जखणगाव, हमीदपूर या भागांमध्ये गेल्या एक महिन्यापासून बिबटय़ांचा वावर वाढला आहे. आज खारे कर्जुने परिसरातून दोन बिबटे वन विभागाच्या पथकाने पकडले आहेत. बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतकरी आणि शेतमजूर येत नाहीत, अशी स्थिती जिह्यात पाहायला मिळत आहे.

जनावरांचे हाल

खारे कर्जुने, इसळक येथील लहान मुलावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, टाकळी खातगाव, नेप्ती या परिसरामध्ये ऊसक्षेत्र वाढल्याने बिबटय़ांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. दिवसाही शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. जनावरांसाठी ऊस, मका, घास, चारापिके घेण्यासाठी महिलांना शेतात जावे लागते. मात्र, भीतीने महिला शेतात जात नसल्याने जनावरांचे हाल सुरू झाले आहेत.