नव्या मासेमारी हंगामास हवामानाचा ‘ब्रेक’; अनेक नौका किनाऱ्यावरच

310

कोकण किनारपट्टीवरील नव्या मासेमारी हंगामासाठी मच्छिमार सज्ज झाले आहेत. नारळी पौर्णिमेला दर्याला श्रीफळ अर्पण करून होड्या समुद्रात लोटल्या जाणार आहेत. मात्र, समुद्रात व किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढल्याने हवामान विभागाने मच्छिमाराना सावधतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नव्या मासेमारी हंगामास हवामानाचा ‘ब्रेक’ लागणार आहे.

पश्चिम किनारपट्टीवरील शासनाने लागू केलेला 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदी कालावधी 15 दिवसांपूर्वीच संपला आहे. मात्र, समुद्रातील हवामान बदल, वादळी वारे, जोरदार लाटा व मुसळधार पावसामुळे मासेमारी सुरू झालेली नाही. त्यामुळे नौका किनाऱ्यावरच सुरक्षित ठिकाणी उभ्या आहेत. आता नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने नव्या मासेमारी हंगामास सुरवात होणार आहे. मात्र, सध्य स्थितीत समुद्री हवामान अजूनही अशांत असल्याने मासेमारी हंगामाची सुरुवात लांबली आहे.

गेल्या काही वर्षातील मच्छिमारांतील पर्सासीन-पारंपारिक यासह परप्रांतीय हायस्पीड व एलईडी मासेमारी संकट वाढत आहे. मत्स्य विभाग अपेक्षित कारवाई करत नसल्याने किनारपट्टी अशांत आहे. आता नव्या हंगामात पुन्हा परप्रांतीय मासेमारी बोटी व एलईडी मासेमारीचे संकट घोंगावण्याची शक्यता आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती नौका अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. किनारपट्टीवर होणारी बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारी सुरू आहे. यावर कठोर कारवाईसाठी कायद्यात बदल व्हावे म्हणून आमदार वैभव नाईक यांच्या मागणीसुसार मंत्री रामदास कदम, महादेव जानकर, दीपक केसरकर व अर्जुन खोतकर यांची मच्छीमारांसोबत महिन्याभरापूर्वी मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीतील मच्छिमारांच्या सूचना लक्षात घेत एलईडी मासेमारीबाबत कठोर धोरण राज्य शासन राबवणार आहे. मुख्यमंत्री या बाबत सकारात्मक असून मंत्रालय स्तरावर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या