गिर्यारोहक

347

>> वरद चव्हाण

अभिनेता हर्षद दानवे. आपले गडकिल्ले चढून जाणे ही पॅशन. यातूनच हर्षदचा फिटनेस आकारात आला. 

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! व्यायाम करताय ना? महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थात आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या गौरवशाली इतिहासाने प्रेरणा घेतलेले असे आपले आजचे सेलिब्रेटी कलाकार आहेत हर्षद दानवे.

हर्षद आणि मी एक शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने एकत्र आलो.तेव्हाच मला कळले की छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या शौर्यकथा, गडकिल्ले या गोष्टींचे हर्षदला जबरदस्त वेड आहे. खरे तर शाळा-कॉलेजात असताना मैदानी खेळ, व्यायाम याचे आकर्षण नव्हते. हर्षदचे वडील संगीत विशारद होते म्हणून हर्षदला अभंग, संगीत याची आवड होती. हर्षदचे पहिले ट्रेकिंग झाले रायगडावर. तेव्हा तो तिसऱया इयत्तेत शिकत होता. त्यामुळे खूप लहान वयातच ट्रेकिंगची आवड रुजली. दर आठ-दहा दिवसांनी ट्रेकिंगला गेले नाही तर त्याला खूप चुकल्यासारखे वाटते. ट्रेकिंग तर होतेच, पण तुला व्यायामाची आवड कशी लागली हे विचारल्यावर हर्षद म्हणाला की, 2004 साली मोटरसायकलवरून जाताना त्याचा अपघात झाला. लिगामेंटस्ना दुखापत झाली होती. गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले ट्रेकिंग बंद. फक्त आराम आणि फिजिओथेरपी घ्यायची असा डॉक्टरांनी सल्ला दिला. पूर्णपणे बरे होईपर्यंत ट्रेकिंग बंद म्हणून हर्षद बैचेन झाला.

आता यातून बरे व्हायचे तर व्यायामाशिवाय पर्यायच नव्हता. शिवाय ऑक्टिंग, मॉडेलिंगमध्ये फिजिकल फिटनेस आवश्यक आहेच. त्यामुळे गरजेचा व्यायाम आता आवडीने करू लागलो. ट्रेकिंगसाठी पायाचे मसल्स टाइट असणे गरजेचे आहे. स्टॅमिना वाढवणे, मसल्स टोन्ड करणे याकडे तो जास्त लक्ष देऊ लागला. जिममध्ये जाणे, रोज 6-7 कि.मी. चालणे किंवा धावणे ही हर्षदची दिनचर्या झाली. नवनवे गडकिल्ले त्याला खुणावत होते. ट्रेकिंगबद्दल बोलताना हर्षद म्हणाला की, कधी कधी तीन-चार दिवसांचा मुक्काम असतो. म्हणजे एक किल्ला उतरून दुसऱया किल्ल्यावर जाताना पायथ्याशी मुक्काम करायचा. सर्व साहित्य असलेल्या बॅगेचे वजन साधारण 10-12 किलो असत. ही बॅग पाठीवर घेऊन तीन-चार तास चढणे यातच भरपूर कॅलरीज बर्न होतात. मग खूप भूक लागते. गावातल्या एखाद्या हॉटेलात नॉनव्हेजवर ताव मारतो किंवा एखादा घराबाहेर ओसरीवर मुक्काम केला तर जेवण स्वतःच बनवतो. पण गडावरच्या एखाद्या मंदिरात मुक्काम केला की मात्र शाकाहारीच जेवतो. मग जवळच्या दुसऱया गडाकडे प्रस्थान करायचे. गडावर राहायला परवानगी लागत नाही. शुद्ध हेतूने गडकिल्ल्यावर प्रेम असणाऱयाच गावकरी मोठय़ा दिलाने स्वागत करतात, मदत करतात. कधी मजा, टाइमपास करायला येणाऱया ग्रुपबरोबर पंगा घ्यावा लागतो. गावकऱयांच्या मदतीने अशा लोकांना सिगारेट, दारू पिणे या गोष्टी किल्ल्यावर करू देत नाही. महाराजांच्या शूर मावळय़ांनी जिंकलेल्या किल्ल्यांचे पावित्र्य आपणच राखायला नको का? हर्षद अगदी तळमळीने बोलत होता.

गड चढणे सोपे की उतरणे असे विचारल्यावर हर्षद म्हणाला की, काही लोकांना उतरताना, वरून बघताना थोडी भीती वाटते. पण हर्षदला उतरणे सोपे वाटते. तुमच्या शूजची ग्रीप बरोबर असेल तर उतरताना चांगली पकड मिळते. आत्मविश्वास वाढतो असे तो म्हणतो. हर्षदचे ट्रेकिंग वर्षभर चालू असते का असे विचारले तर तो म्हणतो की, पावसाळय़ात भटकंती करतो. पण चढणे-उतरणे कठीण असते. वाट निसरडी होते म्हणून कोकणातील गडावर थंडीत आणि घाटमाथ्यावरील गड केव्हाही करता येतात. खूपच उंचच उंच कडय़ावर जायचे असेल तर रात्रीच ट्रेकिंग करतो. मग तिथेच दोन-तीन तास आराम करायचा. गप्पा-गाणी, पोवाडे म्हणतो. जाण्यापूर्वी किल्ल्याचा अभ्यास करता का? यावर हर्षद म्हणतो की, गडाची भौगोलिक रचना आणि इतिहास समजून मगच जातो. म्हणजे किल्ल्यावर भटकताना इथे या सदरेवर महाराज आऊसाहेबांना भेटले होते. असे लगेच डोळय़ांसमोर येते, छाती अभिमानाने भरून येते. महाराजांच्या समोर आपोआपच नतमस्तक होतो. जर तुमचा अभ्यास नसेल, आवड नसेल तर तुम्हाला त्या सदरेच गांभीर्य वाटणार नाही. एक दगड म्हणून तुम्ही पहाल. म्हणूनच आजच्या लहान लहान मुलांना महाराष्ट्राचा इतिहास कळावा, गडकिल्ल्यांबद्दल रुची वाढावी अशी तळमळ हर्षदच्या बोलण्यात जाणवते. अर्थातच यासाठी आवश्यक आहे ती इच्छाशक्ती आणि स्टॅमिना वाढवायला, मस्क्युलर स्ट्रेंथ वाढवायला नित्यनियमाने योगा आणि व्यायाम करायलाच हवा.

मग काय मित्रांनो, हा लेख वाचून या विकेंडला जवळपास एखाद्या किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन आखताय ना! जरूर जा. पण किल्ल्यावरची थंड हवा, निसर्ग अनुभवताना सेल्फी काढायचा मोह झालाच तर मात्र गडाच्या टोकावर सेल्फी काढू नका. स्वतःची काळजी घ्या. भेटू पुढच्या शनिवारी नवीन सेलिब्रिटीच्या व्यायामशाळेत… त्याच्या या सुखद ट्रेकिंगचा अनुभव तुम्ही घेऊ शकता ‘हर्षद दानवे’ या यू टय़ूब चॅनेलवर.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या