पाच एकर मक्याची 25 रुपये नुकसानभरपाई

806

राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर दाद कुणाकडे मागायची असे म्हणतात. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसाच्या तडाख्याने बेजार झाला असतानाच त्याची सारी भिस्त विमा कंपन्यांवर होती. मात्र या विमा कंपन्यांनीच मुजोरपणा दाखवायला सुरुवात केली आहे. कळवण मधील बाळासाहेब पाटील या शेतकऱयाची पाच एकर मक्याच्या शेतीचे नुकसान झाले असतानाच या विमा कंपनीने मात्र त्यांना केवळ 25 रुपये इतकीच नुकसान भरपाई देऊन त्यांची क्रूर थट्टा केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

नैसर्गिक नुकसानीपासून शेतमालाचा संभाव्य धोका टळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने तालुका कृषी कार्यालयामार्फत पीक विमा काढावा यासाठी शेतकऱयांकडे एकप्रकारे तगादाच लावला होता. त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱयांनी पीक विमा काढला होता. यात पाळे खुर्द ता कळवण येथील शेतकरी बाळासाहेब वामनराव पाटील यांची पाच एकर शेती आहे. त्यांनी जुलै 2019 महिन्यात पाच एकर मक्यासाठी 1 हजार 6 रुपये 5 पैसे विमा हप्ता भरून विमा काढला होता. परतीच्या पावसाने व अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते.

कृषी विभागामार्फत नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविली होती. त्यांच्या माहिती नुसार विमा कंपनीचे प्रतिनिधी या परिसरात नुकसानीचे पंचनामे करण्यासही आले नव्हते. त्यांच्या शेतातील 70 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच संपूर्ण चाऱयाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. विमा कंपनीने फक्त 25 रुपये बँक खात्यावर पाठविण्याचा पराक्रम केला आहे. तसा संदेश भ्रमणध्वनी त्यांना प्राप्त झाला आहे. हा विमा काढण्यासाठी त्यांना एक हजार सहा रूपांचा विमा हप्ता व कळवण येथे ऑनलाईन कागदपत्रे पाठवण्यासाठी 250 रुपये खर्च आला आहे असे असतांना पिकाची नुकसान 25 रुपये पाठवून विमा कंपनीने शेतकऱयांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

विमा काढण्यासाठी लागणाऱया खर्चा एवढा हि नुकसान भरपाई न मिळाल्याने विमा कपंनीने शेतकऱयांची घोर फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकाराने शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत. या बाबत शासन, कृषी विभाग व विमा कंपनी विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याच्या हालचाली शेतकरी वर्गात सुरु झाल्या आहेत.

आम्ही दरवर्षी एकरी 30 क्विंटल मका उत्पादन घेतो. यावर्षी अतिवृष्टीमुळे 10 क्विंटल उत्पादन झाले. आमचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने 25 नुकसान भरपाई देऊन आमची थट्टा केली आहे. जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असून या विरोधात लवकरच आंदोलन उभारू.

आपली प्रतिक्रिया द्या