गटारी पार्टी करायला गेले अन् फ्रेंडशीप डे च्या दिवशीच मित्र कायमचे दुरावले!

गटारी, फ्रेंडशीप डे आणि शनिवार-रविवार सुट्ट्या असा सर्वच योग जुळून आल्याने पाच मित्र पार्टीसाठी तानसा धरण क्षेत्रात गेले. मात्र त्यांची ही पार्टी शेवटची ठरली आणि काळाच्या घाल्यामुळे पाचही मित्र कायमचे दुरावले. धरणाच्या मुख्य प्रवाहाच्या गेटजवळच कारमध्ये बसून पाच मित्र पार्टी करत होते. मात्र अचानक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आणि कारसह पाचही मित्र पाण्यात वाहून लागले. तिघांनी वेळीच कारमधून उडी घेतल्याने ते बचावले आहेत. तर एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे.

गणपत चिमाजी शेलकंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. शहापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्व तरुण कल्याण येथील रहिवासी आहेत.

गटारी पार्टी करण्यासाठी कल्याणमधील पाच मित्र शनिवारी दुपारी शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात कारने गेले होते. तानसा धरणाच्या गेट नंबर 1 जवळ कारमध्ये बसून पाच मित्र पार्टी करत होते. याचदरम्यान तानसा धरणाचे 24 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला आणि पाण्याच्या प्रवाहात कार वाहून जाऊ लागली.

कार वाहू लागल्यानंतर तिघांनी कारमधून तात्काळ उडी घेतल्याने ते बचावले. तर गणपत शेलकंदे आणि अन्य तरुण कारमध्ये अडकले. यामुळे गणपतचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाला. तर दुसरा उद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता तरुणाचा शोध सुरु आहे.