जम्मू-कश्मीरमधील विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर केंद्रीय गृहखात्याने लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येत असल्याची घोषणा केली.
जम्मू-कश्मिरातून कलम 370 हटवताना लडाखला स्वतंत्र करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर आता जम्मू-कश्मिरात विधानसभेची निवडणूक घेण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर प्रशासकीय सोयीचे कारण दाखवून केंद्रीय गृहखात्याने लडाखमध्ये जास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा घाट घातला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती दिली. लडाखच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लडाखमध्ये सध्या फक्त लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे आहेत. पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर आता ही संख्या सात झाली आहे.
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. उत्कृष्ट प्रशासनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.