रिक्षावाले अंबरनाथकरांचा खिसा कापणार, शेअर प्रवासी भाड्यात पाच रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबरनाथ

महागाईने आधीच पंबरडे मोडले असताना अंबरनाथवासीयांचा खिसा आता रिक्षा प्रवासात कापला जाणार आहे. शेअर रिक्षाच्या भाडय़ात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय रिक्षा संघटनांनी केला असल्याने आता दहाऐवजी पंधरा रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. आरटीओची कोणतीही परवानगी न घेता रिक्षा संघटनेने ही भाडेवाढ केली असून 1 डिसेंबरपासून ती लागू होणार आहे.

अंबरनाथ पश्चिमेकडील जोशीकाका रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीनेही रिक्षा प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 1 डिसेंबरपासून ही भाडेवाढ होणार असल्याचा फलक रिक्षा स्टॅण्डवर लावण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे स्थानक ते गावदेवी थांबा, बालाजी नगर, शिवलिंग नगर, भवानी चौक, गणेश नगरपर्यंत जाण्यासाठी 15 रुपये प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे, तर खामकर वाडी आणि पनवेलकर होम्स थांब्यापर्यंत आणि त्यापुढे किमान 20 रुपये प्रवासी भाडे आकारले जाणार आहे.

चौथी सीट बंद
रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला बसविण्यात येणारी चौथी सीट घेण्यास संघटनेने बंदी घातली आहे. तीनपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास रिक्षाचालकाकडून 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.