School Van Fire – धावत्या स्कूल व्हॅनला आग, चालकासह पाच विद्यार्थी भाजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावत्या स्कूल व्हॅनला आग लागल्याने चालकासह पाच विद्यार्थी भाजल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. पोलीस आणि कुटुंबीयांच्या मदतीने तात्काळ सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून प्रशासनाने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली. अपघातग्रस्त व्हॅन आशिष इंग्लिश अकादमी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन चालली होती. अचानक व्हॅनमधून धूर निघू लागला आणि आग लागली. मुलांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत त्वरीत मुलांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.

प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी जळालेली व्हॅन ताब्यात घेतली असून पुढील तपास करत आहेत. परिवहन विभाग आणि अग्निशमन दलाच्या समन्वयाने आगीचे नेमके कारण शोधले जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने शाळेच्या वाहनांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आशिष इंग्लिश अकादमीच्या व्यवस्थापनाने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.