शेजाऱ्यांच्या गॅसच्या भडक्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

2

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

शेजाऱ्यांनी रात्रभर गॅस सुरू ठेवल्याने उडालेल्या भडक्यामुळे कळंबोली येथील पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सोहम कट्टे असं या मुलाचं नाव असून त्याचे आई-वडील आणि दोन शेजारीही या घटनेत जखमी झाले आहेत.

बबन कट्टे (४०) आणि शुभांगी कट्टे (३२) अशी सोहमच्या आईवडिलांची नावं आहेत. हे दांपत्य कळंबोली येथे एका चाळीत भाड्याने राहतं. या दांपत्याच्या शेजारी राहणाऱ्या अश्विनी जाधव आणि नाना जाधव यांच्या घरी ही भयंकर घटना घडली. बुधवारी रात्री अश्विनी यांच्याकडून स्वयंपाकाची गॅस बंद करायचं राहून गेलं. गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता अश्विनी यांनी चहा करण्यासाठी गॅस पेटवताच भडका उडाला. या भडक्यामुळे जाधव आणि कट्टे यांच्या घरांना सामायिक असलेली भिंत कोसळली आणि त्याच्याखाली चिरडून सोहमचा मृत्यू झाला. सोहमच्या दोन बहिणी आजोळी गेल्यामुळे त्या या अपघातातून बचावल्या.

उडालेल्या भडक्यामुळे अश्विनी आणि नानाही जखमी झाले आहेत. अश्विनी या ६० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून पुढचे ४८ तास त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. ही घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून गळत असलेल्या गॅसचा वास कोणालाच कसा आला नाही, हा प्रश्न त्यांना पडला आहे.