पूरप्रवण क्षेत्रातील पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविणार – देवेंद्र फडणवीस

483

शिरोळ तालुक्यात यापूर्वी 2005 मध्ये आलेल्या पुरावेळी जेवढी मदत तत्कालीन सरकारने केली नाही, त्यापेक्षा पाचपट मदत शिवसेना-भाजप युती सरकारने केली आहे. पुन्हा महापुराचे संकट ओढावू नये, यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने महापूरप्रवण क्षेत्रातील पाणी राज्याच्या दुष्काळी भागाकडे वळविण्याची योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यामुळे महापुराच्या संकटातून शिरोळ तालुक्याची कायमची सुटका होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यभर भाजपच्या वतीने काढण्यात येत असलेल्या महाजनादेश यात्रेने सोमवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जयसिंगपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, की महापुरामुळे लाखो लोक विस्थापित, बेघर झाले. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने पावले उचलली आहेत. मागील महापुरावेळी तत्कालीन सरकारपेक्षा जास्त मदत युती सरकारने दिली आहे. जागतिक बँक, आशियाई बँक यांच्या मदतीने पूरप्रवण क्षेत्रातील अतिरिक्त पाणी मराठवाडा, विदर्भासह सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला वळविण्यासाठी योजना आखत आहोत. त्यामुळे येथून पुढे महापुराची भीती बाळगण्याची गरज नाही. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. या यात्रेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय पाटील सहभागी झाले होते. भाजपचे महामंत्री बाबा देसाई यांच्यासह अनिल यादव, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, शहराध्यक्ष मिलींद भिडे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने आदींनी त्यांचे स्वागत केले. आभार रमेश यळगूडकर यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या