
अहिल्यानगर आणि बीड जिह्यांत आभाळ फाटले असून पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून बचावकार्यासाठी आष्टी तालुक्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या अनेक गावकऱयांना एअरलिफ्ट करण्यात आले.
बीड जिह्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. आष्टीतील कडी नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले असून अनेक कुटुंबे अडकून पडली आहेत. लोक इमारतींवर चढून मदतीची याचना करीत असल्याची भीषण दृष्ये समोर आली. लष्कराचे पथक दाखल झाले असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जेसीबीच्या सहाय्यानेही गावकऱयांना पुरातून बाहेर काढण्यात येत आहे. पुरात अनेक जनावरे वाहून गेली असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव, मढी या भागांत ढगफुटीसारखा पाऊस झाला. परिसरातील गावे पुरात अडकली असून पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. वाडय़ा-वस्त्यांना पाण्याने वेढले आहे. करंजी आणि जवखेडे या गावांतील स्थिती गंभीर आहे. या दोन्ही गावांतील 70 ते 80 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. करंजी गावातून 16 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.