पाकिस्तान पुराने बेजार, 20 लाख नागरिकांना फटका; दोन हजार गावे पाण्याखाली, 854 लोकांचा मृत्यू

पाकिस्तानला सध्या पुराच्या पाण्याने बेजार केले आहे. हिंदुस्थानातून वाहणाऱ्या रावी, सतलज, चिनाब नद्यांना पूर आल्यामुळे या नद्यांचे पाणी पाकिस्तानात गेल्याने या ठिकाणी पूरसृदश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतात पुराच्या पाण्याचा फटका जवळपास 20 लाख लोकांना बसला आहे. पाकिस्तानातील 20 हजार गावे पाण्याखाली गेली असून 845 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाबच्या 2 हजार 200 गावांतील 20 लाखांहून अधिक लोकांना आपले घर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच हिंदुस्थानातील नद्यांचे पाणी पाकिस्तानात गेल्याने पाकिस्तानातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पाकिस्तानातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून नद्यांचे पाणी गावात शिरले आहे. ज्या गावात पूर आला आहे. त्या ठिकाणी प्रशासनाकडून बचाव कार्य आणि मदत कार्य केले जात आहे. यामध्ये लष्कर, पोलीस आणि अन्य एजन्सी मदतीसाठी सरसावल्या आहेत. आतापर्यंत 7 लाख 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पशू, पक्षी यांनाही पुराचा तडाखा बसला आहे. संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी सिंधकडे जात असून प्रशासनाकडून सुपर फ्लड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी गुड्डू आणि सक्कर बैराज या ठिकाणचा दौरा करून नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. सिंधमधील 15 जिह्यांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे. पुरामुळे 16 लाख लोकांना फटका बसला आहे.

पाकिस्तानचा हिंदुस्थानवर आरोप

हिंदुस्थानकडून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची माहिती पाकिस्तानला दिली जात नाही, असा गंभीर आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. नद्यांचे पाणी अचानक सोडल्याने पाकिस्तानात पुराचे पाणी आले आहे. यामुळे पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. सतलजसह अन्य नद्यांचे पाणी हिंदुस्थानकडून पुन्हा सोडले जाऊ शकते, असेही पाकिस्ताने म्हटले आहे.