मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात एफडीए अधिकारी आक्रमक

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या आमदार आमशा पाडवी रोष शांत करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. पण आता ‘एफडीए’मधीलच अधिकाऱयांचा नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी 10 मार्च रोजी महेश व रमेश तंवर यांच्या दुकानावर छापा टाकून रिफाइन सोयाबीन व शेंगदाणा तेलचे नमुने घेतले होते. हे नमुने छत्रपती संभाजीनगरमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या नमुन्यांचा अहवाल मे महिन्यात नंदुरबार कार्यालयाला मिळाले. त्यात दोन्ही नमुने हे अप्रमाणित असल्याचे कळवण्यात आले. नंदुरबार कार्यालयाने हे नमुने अप्रमाणित असल्याचे संबंधित दुकानदाराला कळविले. दरम्यान, पुढे जूनमध्ये हे दोन्ही नमुने फेरविश्लेषणासाठी म्हैसूर येथील सेंट्रल फुड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूटला पाठवण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील व्यापारी महेश व रमेश तंवर यांच्या दुकानात अप्रमाणित तेलाचे साठे आढळल्यानंतर नाशिक विभागाचे सह आयुक्त महेश चौधरी व नंदुरबार जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे आणि आनंद पवार यांचे निलंबन करावे, असे आदेश या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिवेशनात दिले होते.

लेखणी बंद आंदोलन

या अधिकाऱ्यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने केले असा पवित्रा घेत अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी वर्गाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात राज्यभरात अधिकाऱयांचे लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.