
घराघरात दैनंदिन वापरातला अविभाज्य घटक म्हणजे तेल आणि तूप… देवासमोरची दिवाबत्ती असो किंवा दररोजचा स्वयंपाक… तेल-तुपाशिवाय देवपूजा आणि पेटपूजा पूर्ण होतच नाही. पण गेल्या वर्षभरात घरगुती वापरातील तेलाचा अक्षरक्षः भडका उडाला आहे. महिनाभराचे वाणसामान भरताना बहुसंख्य घरात पाच लिटरचा तेलाचा डबा ठरलेला असायचा. पूर्वी 500 ते 600 रुपयांना मिळणारा तेलाचा डबा आता हजारच्या घरात गेल्याने गृहिणींचे महिनाभराचे बजेटच कोलमडले आहे. देवपूजेसाठी बहुसंख्य घरात वापरात असलेली पामतेलाची एक लिटरची पिशवीही 110-115 रुपयांवरून आता थेट 160 रुपयांवर पोहोचली आहे.
मागील मे महिन्यात शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेल या सहा प्रकारच्या तेलाची रिटेल पिंमत 11 वर्षांत प्रथमच सर्वाधिक आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावात सर्वसामान्यांच्या नोकऱया जात असून मासिक वेतनालाही कात्री लागली असताना जीवनावश्यक खाद्यतेलाचे दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे.
वर्षभरात तेलाच्या दरात 20 ते 60 टक्क्यांची वाढ
देशातील विविध राज्यांत जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. कन्झ्युमर अफेयर्स विभाग सहा प्रकारच्या तेलाचे दर निश्चित करतात. यात शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेलाचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात या सर्व प्रकारच्या तेलाच्या दरात 20 ते 60 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आयात शुल्क कमी केल्यास तेलाचे दर कमी होतील
देशात 60 टक्क्यांहून अधिक खाद्यतेल आयात केले जाते. पामतेलावर 32.5 टक्के आयात शुल्क आहे. तर सोयाबीन तेलावर 35 टक्के आयात शुल्क आकारण्यात येते. पेंद्राने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यास तेलाच्या किमती कमी होतील. याविषयीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला आहे.
तेलाचे दर का वाढताहेत?
देशात होणारे खाद्यतेलाचे उत्पादन पुरेसे नाही. हिंदुस्थानात एकूण गरजेच्या केवळ 40 टक्के खाद्यतेलाचे उत्पादन होते. मागणी आणि पुरवठय़ातील दरी भरून काढण्यासाठी 60 टक्के खाद्यतेल बाहेरील देशांतून आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्याने देशातही तेलाच्या दरात वाढ झाली आहे. मार्च महिन्यात पेंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली होती.
कोरोनामुळे पुरवठय़ावर परिणाम
तज्ञांच्या मते कोरोनामुळे उत्पादक देशांमधून खाद्यतेलाच्या पुरवठय़ावर परिणाम झाल्याने तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावातही खाद्यतेलाची मागणी कमी झालेली नाही. मागणी आणि पुरवठा यातील दरी वाढल्याने किमतीही वाढल्या आहेत. अमेरिका आणि ब्राझीलसह काही देश खाद्यतेलाचा वापर बायोफ्युअल करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे तेलाचा तुटवडा जाणवत आहे.
1990 च्या दशकात ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्ती महिन्याला सुमारे 0.37 किलो तेल वापरत होता. तर शहरी भागात 0.56 किलो तेल वापरले जाते. वर्ष 2000 च्या सुरुवातीला तेलाच्या वापराचे प्रमाण वाढले. ग्रामीण भागात 0.56 तर शहरी भागात 0.66 किलो तेल वापरले जाऊ लागले. 2010 मध्ये तेलाचा वापर वाढून 0.67 आणि 0.85 किलोवर पोहोचला. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत देशात प्रत्येक वर्षी एक व्यक्ती 19.10 ते 19.80 किलो तेल वापरत आहे. देशात पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाचे तेल आयात केले जाते. अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तर इंडोनेशिया, मलेशियामधून पामतेल आयात केले जाते.






























































