खेळाडूंकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कारवाईकडे क्रीडाशौकिनांच्या नजरा

472

लॉकडाऊनमुळे तब्बल चार महिने बंद पडलेले क्रीडाक्षेत्राचे लॉक आता उघडले आहे. मात्र, खेळ सुरू झाले तरी कोरोनाच्या अजगरी विळख्यातून जगाची अद्यापि सुटका झालेली नाही. काही नियमावली तयार करून क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरी खेळाडूंकडून जल्लोषाच्या नादात सर्रासपणे सोशल डिस्टन्सिंग या प्रमुख नियमाचाच फज्जा उडालाय. त्यामुळे खेळाडूंवर शासन व आयोजकांकडून काय कारवाई होणार, याकडे तमाम क्रीडाशौकिनांच्या नजरा असतील.

रग्बीसह फुटबॉल, क्रिकेट, बेसबॉल, मार्शल आर्ट्स अन् फॉम्र्युला-1 रेस असे खेळ आता सुरू झाले आहेत. इंग्लिश प्रीमियर लीग आणि इंग्लंंड-वेस्ट इंडीजदरम्यान सलामीच्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळाडूंकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली झाली आहे. इंग्लंडमध्ये 17 जूनपासून सुरू झालेल्या प्रीमियर लीगमध्ये वाटर ब्रेक व गोल झाल्यानंतरच्या जल्लोषात खेळाडूंनी अजिबात नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे लीगमधील सर्व 20 संघांना इंग्लंडच्या शासनाने तंबी दिली आहे. प्रशिक्षकांच्या वागणुकीवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत.

कसोटीतही नियमांचा विसर

इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदरम्यान नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. जल्लोष करताना अलिंगनासह एकमेकांना टाळ्या देणं, पाठ थोपटणं हे सर्रासपणे सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, अशी आयसीसीने ताकीद दिली होती. मात्र, पहिल्याच सामन्यात या नियमांचा विसर पडल्याने ‘आयसीसी’ काय करणार हे बघावे लागेल.

… तर हंगेरी ग्रांप्रीमध्ये होणार दंड

येत्या रविवारी हंगेरी ग्रांप्री फॉम्र्युला वन रेस होणार आहे. यादरम्यान सरकार आणि आयोजकांच्या वतीने कडक नियमावली तयार केली. या नियमांचे पालन न केल्यास 13 लाखांची दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या