
सामना ऑनलाईन, अहमदनगर
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने विविध भागातील रस्त्यांवर पे एन्ड पार्क तसेच नो व्हेईकल झोन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही मार्गावरील हा उपक्रम सुरु करण्यासंदर्भात हरकती नोंदविण्यात आल्या. त्या हरकतींचा विचार करुन या संदर्भातील आराखड्यात सुधारणा करण्यात येतील आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ही निर्णय घेण्यात आला.
उपायुक्त ज्योती कावरे यांच्यासह नगररचना, महापालिका, वाहतूक पोलीस, परिवहन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध संस्था संघटनानी पे एन्ड पार्क, नो व्हेईकल झोन यासंदर्भात हरकती नोंदवल्या होत्या. त्यावर चर्चा करण्यात आली. विविध बाबींचा उहापोह यावेळी करण्यात आला. कापड बाजार, प्रोफेसर चौक आदिकाणी करण्यात येणाऱ्या या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व बाजूने विचार करुन आराखड्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याठिकाणी कोणतेही आक्षेप नाहीत, त्याठिकाणची कार्यवाही मात्र सुरु करण्यात येणार आहे.





























































