‘बार्बी डॉल’सारखी दिसण्यासाठी केल्या १५ शस्त्रक्रिया, आता आहे मृत्युशय्येवर

106

सामना ऑनलाईन । नॉर्वे

बार्बी डॉलप्रमाणे दिसण्यासाठी अनेक तरुणी चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करत असल्याचं जगजाहीर आहे. पण फिनलँडमधील एका वेबकॉम मॉडेलने बार्बीसारखी दिसण्यासाठी संपूर्ण शरीरावरच तब्बल १५ शस्त्रक्रिया केल्या. एवढ्या शस्त्रक्रियांमुळे तिच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाली असून सध्या ती मृत्युशय्येवर असल्याची चर्चा आहे. अमांडा अहोला (२१) असे तिचे नाव आहे.

अमांडाने बार्बीसारखं दिसण्यासाठी १९,००० युरो (१५ लाख) खर्च केले आहेत. नाक आणि ओठांबरोबरच शरीराला उभार देण्यासाठी अमांडाने या शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर तिची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली. तिच्या मेंदूला सूज आली असून त्याचा परिणाम इतर अवयवांवरही होत आहे. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने सोशल साईटवर आपल्या तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती. तसेच आई वडील व बॉयफ्रेंडला मी शस्त्रक्रिया करून घेणं आवडत नाही. पण बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी मी वाटेल ते करू शकते, असं अमांडाने म्हटलं होतं.

अमांडा आपल्या कुटुंबापासून विभक्त राहते. या शस्त्रक्रियांसाठी तिने मिळेल ते काम करून युरो जमवले आहेत. वेबकॉम मॉडेल होण्याआधी तिने एका हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी म्हणूनही काम केले होते. याआधी हॉलिवूड स्टार अॅँजिलीना जोली हिच्यासारखं दिसण्यासाठीही एका तरुणीने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला होता. तिने फोटोही सोशल साईटवर पोस्ट केले होते. पण नंतर त्या तरुणीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा बनाव केल्याचे उघड झाले.

आपली प्रतिक्रिया द्या