खोटय़ा गुन्हय़ात अडकवण्याची धमकी देणाऱ्या वनकर्मचाऱ्याला अटक

सातारा तालुक्यातील पिरेवाडी येथील युवकाला शिकारीच्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 25 हजार रुपये उकळल्याप्रकरणी एका वन कर्मचाऱयाला बोरगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात चार वन कर्मचाऱयांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

महेश साहेबराव सोनावले (वय 28, रा. घोट, ता. पाटण) असे या वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यातील वनपालासह अन्य दोन वन कर्मचारी अद्याप फरार आहेत.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार श्यामराव शिंदे या युवकाला वन विभागाच्या चार कर्मचाऱयांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 25 हजार रुपये उकळले होते. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. याची तक्रार ओंकार शिंदे यांनी 5 सप्टेंबर रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित, वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले, रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेक ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते. यादरम्यान त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळणार हे लक्षात येताच संशयितांनी अर्ज मागे काढून घेतला होता. अखेर महेश सोनावले याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या