वनजूरास 20 हजारांची लाच घेताना पकडले; एसीबीची कारवाई

503
bribe

शेतात माती भरीत असताना वनविभागाच्या रस्त्याचा वापर माती वाहणाऱ्या वाहनाने केला असल्याचे सांगून मशीन मालकाकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या वनमजूराला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी आपल्या पोकलेन मशीनने शेतकऱ्याच्या शेतात माती भरत असताना वाहतूक करणारे टिपर वनविभागाच्या हद्दीतील रस्त्याने जात असल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे, असे सांगून वनमजूर धनाजी प्रभू कांबळे (रा. कळस, ता. इंदापूर) यांनी तक्रारदारंकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 20 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पडताळणी करून भिगवण परिसरातील मदनवाडी चौकात सापळा रचून तक्रारदाराकडून 20 हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना कांबळे यास पकडले. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास ॲण्टी करप्शन विभागाचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या