वनरक्षक पद भरतीचा घोळ; अकारण आधारच्या सक्तीने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

सामना प्रतिनिधी । परभणी

वनरक्षक या पदासाठी सध्या राज्यभरात ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. त्या परीक्षेसाठी हॉलतिकीट सोबत मूळ आधारकार्डची सक्ती केल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले असून त्यांना जाणिवपूर्वक परीक्षेपासून वंचित ठेवले आहे. अशा वंचित विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थी वर्गातून जोर धरीत आहे. विशेष म्हणजे या वंचित विद्यार्थ्यांना अजुनही परीक्षा देता येते. कारण 130 केंद्रावर 9 जून पासून ऑनलाईन परीक्षा सुरु असून त्या परीक्षा 22 जून पर्यंत चालणार आहेत.

वन खात्यातील 951 वनरक्षक पदाच्या भरतीसाठी संभाजीनगरसह राज्यातील विविध 130 केंद्रावर 9 जून पासून ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत. त्यासाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कारण सध्या राज्यात सुशीक्षीतांसाठी शासकीय भरतींची मोठी वानवा झाली आहे. वनविभागाची हिच भरती 3 वर्षानंतर आली आहे. वनरक्षक पदासाठी 22 जून पर्यंत चालणार आहे. शहरातील 7 केंद्रावर परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. मंगळवार, 18 जून रोजी हार्सुल येथील ड्रिमलँड इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रात परीक्षार्थ्यांना मुळ आधारकार्डासाठी प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. आपली परीक्षा होईल, या अपेक्षेने विद्यार्थी परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत थांबले होते. त्यांची एक प्रकारे प्रचंड ससेहोलपट झाली. संबंधीत अधिकारी मात्र हा तमाशा पहात राहिले. काही विद्यार्थ्यांनी सक्तीचे आधारकार्ड पाहिजे, असे लेखी द्या म्हटल्यास संबंधीत अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. परिणामी विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नाहीत. आता या वंचित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होत आहे. असे न झाल्यास विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड
सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला असताना त्यांना मात्र किरकोळ बाब समोरकरून वेळमारून नेण्याचे काम हर्सुल टी पाँईटच्या ड्रिमलँड इंग्लिश स्कूल या केंद्रावरून केली आहे. मुळ आधारकार्ड (पोस्टामार्फत आलेले) असेल तरच परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल, अशी अकारण सक्ती करत विद्यार्थ्यांना नाहक वेठीस धरण्यात आले. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव आल्या पावली परतावे लागते. याबाबत निराश विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडालासा सामोरे जावे लागले. दिवसभराचा वेळ वाया गेल्याने विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत.