झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांना रांचीच्या धुर्वा येथील शहीद मैदानावर एका कार्यक्रमात भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा आता पती-पत्नी आणि दलालांचा पक्ष बनल्याची टीकाही चंपई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधताना केली. चंपई सोरेन यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, झारखंडमधील जनतेचे प्रेम पाहून पुन्हा राजकीयदृष्टय़ा सक्रिय होण्याचे ठरवल्याचे सोरेन यांनी सांगितले. झारखंड चळवळीचे चढउतार मी पाहिले आहेत. मी मनाने शुद्ध आहे, माझ्यावर हेरगिरी केली जाईल असे कधीच वाटले नव्हते. झारखंडसाठी लढणाऱया व्यक्तीच्या मागे गुप्तहेर ठेवण्यात आले होते, असा आरोपही चंपई सोरेन यांनी केला.