
मुंबई महानगरपालिकेचे महापौर पद प्रथमच मिळाल्यानंतरही भाजपकडून तिथे संघधार्जिण्या व्यक्तीची नेमणूक न करता पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या रितू तावडे यांना विराजमान केले गेले. भाजपच्या या निर्णयाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यापेक्षाही मोठे आश्चर्य म्हणजे रितू तावडे यांनाच महापौर करण्यासाठी काँग्रेसचाच एक माजी नेता दिल्ली दरबारी तळ ठोकून होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाल्यानंतर मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापौर पदासाठी चढाओढ सुरू होती. महापौरपदाच्या उमेदवारीसाठी संघाने वेगळ्या नावावर एकमत केले होते. ते नाव जवळजवळ अंतिम झाले होते, परंतु शेवटच्या क्षणी, मुंबई ते दिल्ली असे वजन वापरले गेले आणि रितू तावडे यांची निवड झाली, असे सांगितले जाते.
सध्या भाजपमध्ये असलेल्या माजी काँग्रेस नेत्याने रितू तावडे यांना मुंबईच्या महापौर बनवण्यासाठी दिल्लीत अनेक दरवाजे ठोठावले. मुंबईतील एका प्रभावशाली उद्योगपतीचे सहकार्य त्याला लाभले होते, अशीही चर्चा आहे.




























































