
टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाला ईडीने समन्स बजावले असून बुधवारी ईडीने रैनाला चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात बोलावले आहे. संघीय तपास संस्था बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात ईडी त्याचे म्हणणे नोंदवणार आहे. सुरेश रैनाची बेटिंग अॅप प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू असल्याचे वृत्त देण्यात आले होते. तसेच त्याची लवकरच चौकशी होणार असल्याचीही चर्चा होती. आता ईडीने त्याला समन्स बजावले असून बेटिंग अॅप प्रकरणी आज त्याची चौकशी होणार आहे.
बेटिंग अॅप 1xBet ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरेश रैनाला आपला गेमिंग अॅम्बेसेडर बनवले. सुरेश रैनासोबतची आमची भागीदारी क्रीडा चाहत्यांना जबाबदारीने सट्टेबाजी करण्यास प्रोत्साहित करेल. त्याची भूमिका रिस्पॉन्सिबल गेमिंग अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आली आहे आणि तो आमच्या ब्रँडचा पहिला असा अॅम्बेसेडर आहे, असे कंपनीने म्हटले होते.
ईडीने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्सविरुद्ध तपासाला वेग दिला आहे. तसेच सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या अशा बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले आहे. बंदी घातलेल्या बेटिंग प्लॅटफॉर्म्स 1xBet, फेअरप्ले, पॅरीमॅच आणि लोटस 365 च्या जाहिरातींच्या चौकशीचा एक भाग म्हणून, ईडीने यापूर्वी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग तसेच अभिनेता सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांची चौकशी केली आहे.
बेटिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या जाहिरातींमध्ये 1xbat आणि 1xbat स्पोर्टिंग लाइन्स सारखी टोपणनाव वापरत आहेत. या जाहिरातींमध्ये अनेकदा QR कोड असतात जे वापरकर्त्यांना बेटिंग साइट्सकडे पुनर्निर्देशित करतात. हे भारतीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे. अशा बेटिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात करणाऱ्या काही सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हे प्लॅटफॉर्म अनेकदा स्वतःला कौशल्य-आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून प्रमोट करतात, परंतु ते बनावट अल्गोरिदम वापरून बेकायदेशीर बेटिंग करतात, असेही ईडीने म्हटले आहे.