माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते नटवर सिंह यांचे गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री वयाच्या 93व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच काँग्रेसने नटवर सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील भरतपूर येथे राजघराण्यात जन्मलेल्या नटवर सिंह यांनी 2004-05 दरम्यान डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही काम केले आणि 1966 ते 1971 या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विशेष सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. नटवर सिंह यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने 1984 साली सन्मानित करण्यात आले होते.
पाकिस्तान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये ते भारताचे राजदूत होते. त्यांचे ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ हे आत्मचरित्र खूप वादग्रस्त ठरले होते. वयाच्या 22व्या वर्षी भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये भारताचे उप उच्चायुक्त, झांबियातील उच्चायुक्त या जबाबदाऱ्याही सांभाळल्या होत्या. 1984मध्ये भरतपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी 1985-1989पर्यंत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात पोलाद, खाण, कोळसा आणि कृषी राज्यमंत्री म्हणून काम केले होते.