डेव्हिड जॉन्सनची आत्महत्या?

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे आपल्या चौथ्या मजल्यावरील घराच्या गॅलेरीतून खाली पडल्याने निधन झाले. मात्र त्यांचे अपघाती निधन नसून ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वयाच्या 52 व्या वर्षीच जॉन्सनची प्राणज्योत मालवल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली असून, हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार जॉन्सन चौथ्या मजल्यावरून खाली पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रथमदर्शनी जॉन्सन यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलीसांकडून याबाबत कोणतीही माहिती दिली नसून ते सर्वदृष्टीने या घटनेचा आढावा घेत आहेत. गेले काही महिने ते आर्थिक अडचणीत असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांची मनस्थितीही बरोबर नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे.

जॉन्सन यांनी 1996 साली हिंदुस्थानी संघात पदार्पण केले. ते त्याचवर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामने खेळले होते. त्यांनी 2 कसोटी सामन्यांत 3 विकेट घेतल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. 1995-96 च्या रणजी करंडक स्पर्धेत गोलंदाजीत सर्वेत्तम कामगिरी नोंदवली होती. ते आपल्या कारकिर्दीत 39 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 125 विकेट्स घेतल्या आणि 437 धावाही केल्या आहेत. तसेच 33 लिस्ट ए सामन्यांमध्ये 41 विकेट्स घेतल्या.

त्यांच्या निधनाबद्दल सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळेसह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन कर्नाटक क्रिकेट संघटनेने दिले आहे.