माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या कारला सोमवारी अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यात पिकअप वाहनाने संजना यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाले नाही. संजना जाधव आणि त्यांचा चालक, कार्यकर्ते सर्वजण थोडक्यात बचावले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजना जाधव लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. संजना जाधव या कन्नड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. याचसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरून जात असताना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावजवळ पिकअप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान, संजना जाधव यांच्या गाडीचा अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.