राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठी गळती लागली असून, सांगोल्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार दीपक साळुंके-पाटील यांनी सर्व पदांचा राजीनामा देत अजित पवारांची साथ सोडली आहे. दरम्यान, माढ्याचे आमदार बबन शिंदे, मोहोळचे उमेश पाटील यांनी यापूर्वीच अजितदादांची साथ सोडली आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत, तर मोहोळचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील हेही अजित पवार यांची साथ सोडण्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
सांगोल्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार दीपक साळुंके-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष होते. आज दुपारी त्यांनी जिल्हाध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा देत सांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. दीपक साळुंके यांचा राजीनामा अजित पवार गटाला जबर धक्का मानला जात आहे. यापूर्वी माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांची साथ सोडून विधानसभा निवडणूक ‘तुतारी’ घेऊन किंवा अपक्ष लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनीही राजीनामा देऊन ‘तुतारी’च्या संपर्कात आले आहेत.
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी अजित पवार गटात न जाता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सध्या मोहोळचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील हे अजित पवार गटात असले, तरी त्यांचीही भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोहोळचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी माढा, करमाळा, सांगोला तालुक्यांतील आजी-माजी आमदारांनी साथ दिली; परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते बाहेर पडत असल्याने अजित पवार गटाला जबर धक्का मानला जात आहे