2007 मध्ये महामुंबई सेझविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणात 17 वर्षांनंतर जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांना अटक करण्यात आली आहे. बेलापूर न्यायालयाने भोईर यांच्यासह सात शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
रिलायन्सच्या महामुंबई सेझविरोधात 2007 मध्ये उरण परिसरातील शेतकऱ्यांनी संघर्षाची भूमिका घेतली होती. यादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोकणभवनवर धडक देत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काही हिंसक घटना घडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास म्हात्रे यांचाही समावेश होता. याबाबत झालेल्या सुनावण्यांना गैरहजर राहिल्याने बेलापूर न्यायालयाने मनोहर भोईर यांच्यासह सात जणांवर अटक वॉरंट जारी केले होते, अशी माहिती बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणे पाप आहे का? शेतकऱ्यांचा विरोध असताना तत्कालीन सरकारने महामुंबई सेझ प्रकल्प आणला. यानंतर भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणे हे पाप आहे का, असा सवाल शिवसैनिकांसह प्रकल्पग्रस्तांनी केला होता.