
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑल इंडिया किसान सभा आणि देशभरातील विविध दलित संघटनांनी येत्या ९ ऑगस्टला मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी आणि दलितविरोधी धोरणांच्या विरोधात ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये माजी सैनिकही रस्त्यावर उतरण्याचा इतिहास पहिल्यांदाच घडणार आहे.
९ ऑगस्टच्या बंदमध्ये माजी सैनिकही आंदोलनासाठी घराबाहेर पडतील, अशी घोषणा ‘द इंडियन एक्स सर्व्हिसमेन मूव्हमेंट’ (आयईएसएम) या संघटनेचे समन्वयक प्रियदर्शी चौधरी यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी लढणाऱया आम्हा जवानांशीसुद्धा खोटे बोलले. ‘वन रँक, वन पेन्शन’चे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ते अजूनही पूर्ण केले नाही असे सांगून ते म्हणाले की, यापूर्वी माजी सैनिक स्वतंत्रपणे लढले, शेतकरी स्वतंत्रपणे लढले, दलित स्वतंत्रपणे लढले. पण येत्या ९ ऑगस्टला आम्ही सारे एकजुटीने खांद्याला खांदा लावून लढू.
‘ऑल इंडिया किसान सभा’ या संघटनेचे देशातील ४०० जिह्यांत कार्यकर्ते असून ९ ऑगस्टला सर्वत्र ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येईल असे त्या संघटनेचे सरचिटणीस हन्नान मोलाह यांनी सांगितले, तर दलित संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांना २ एप्रिलच्या बंदनंतर ‘रासुका’खाली तुरुंगात डांबण्यात आल्याने त्या संघटना ९ ऑगस्टच्या बंदमध्ये पुन्हा एकदा ताकदीनिशी उतरणार आहेत.


























































