माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचं निधन, जन्मदिनीच घेतला अखेरचा श्वास

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांचे गुरुवारी निधन झाले. 92 वर्षीय तिवारी यांना गेल्या वर्षी पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृति खालावत गेली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

जन्मदिनीच घेतला अखेरचा श्वास

एन.डी. तिवारी यांचा आज (18 ऑक्टोबर, 1925) 93 वा वाढदिवस होता. जन्मदिनाच्या दिवशीच त्यांनी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून तिवारी यांना श्रद्धांजली वाहिली.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एन.डी. तिवारी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्वीटवर तिवारी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यूपी-उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवले

एन.डी. तिवारी यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवले. उत्तर प्रदेशमध्ये 1976-77, 1984-85 आणि 1988-89 अशा तीन वेळा त्यांनी सत्तेची गादी सांभाळली. त्यानंतर 2002 के 2007 पर्यंत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2007 ते 2009 पर्यंत ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते.

आपली प्रतिक्रिया द्या