‘फोर्टचा राजा’ पूरग्रस्तांच्या मदतीला, आगमन सोहळ्यातून जमवणार निधी

300

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील गणेशोत्सव मंडळेदेखील सरसावली आहेत. ‘फोर्टचा राजा’ म्हणून ओळखले जाणारे बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहे. या आगमन सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे पोस्टरच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी निधी जमवण्याचे आवाहन मंडळातर्फे केले जाणार आहे. याशिवाय निधीसंकलन करण्यासाठी आगमन सोहळ्यात दानपेटीदेखील ठेवली जाणार आहे.

‘फोर्टचा राजा’ हे मंडळ यंदा 58 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापुरामुळे कोल्हापूर-सांगलीतील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा बाप्पाचा आगमन सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आगमन सोहळ्यादरम्यान दानपेटीत जमा होणारा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’च्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.

भक्तांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. याशिवाय जुने-नवीन कपडे, धान्य, ब्लँकेट, खाद्यपदार्थ औषधे या स्वरूपातदेखील अधिकाधिक भाविक मदत करू शकतात, अशी माहिती ‘फोर्टचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष बाजीराव दांगट यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या