सिंधगाव येथील अंगणवाडी सेविकेस मारहाण, चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

97

सामना प्रतिनिधी, लातूर

रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे अंगणवाडी सेविकेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चारजणांविरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील मारहाण प्रकरणी कविता नानासाहेब कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मागील 14 वर्षापासून त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत. 19 जुलै रोजी सकाळी 8 वाजता अंगणवाडीला कुलूप लावल्याचे दिसल्याने त्यांनी अंगणवाडी समोर विद्यार्थ्यांना शिकवत असताना गोविंद कृष्णाथ पंडगे, शशिकला राम चेवले, आशाबाई महादेव चेवले, अरुणा हणमंत चेवले हे तिथे आले.

अंगणवाडीच्या खोलीला कुलूप लावलेले दिसत नाही का, असे म्हणून गोविंद पंडगे याने फिर्यादीचा उजवा हात धरून पिरगाळला. मुलांना मटकी व मुगाच्या पुड्या दिल्या नव्हत्या, असे म्हणून शशिकला, आशाबाई व अरुणा यांनी फिर्यादीस खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. नोकरी कशी करतेस ते पाहतो, तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून धमक्या दिल्या. रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या