
मध्य प्रदेशच्या नक्षलग्रस्त बालाघाट जिह्यात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून त्यांच्याकडून हँड ग्रेनेड, सेल्फ लोडिंग रायफल व इतर शस्त्रास्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या मोहिमेत सुरक्षा यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
रूपझर पोलीस ठाण्याअंतर्गत बिथली पोलीस चौकीच्या हद्दीत पचामा दादर भागात शनिवारी दुपारी चकमक सुरू झाली होती. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या त्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. हॉक पर्ह्स व मध्य प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. चकमकीनंतर मुसळधार पाऊस असतानाही सुरक्षा यंत्रणांनी रात्रभर जंगल परिसरात सर्च ऑपरेशन चालू ठेवले होते. बालाघाट जिल्हा नक्षल चळवळीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथील कारवाईने नक्षली चळवळीला मोठा हादरा बसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. या कारवाईबद्दल मध्य प्रदेश सरकार सुरक्षा यंत्रणांच्या जवानांना बक्षीस देणार आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी याबाबत ही घोषणा केली आहे.
महिला नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढले
बालाघाट परिसरात नक्षल चळवळीत महिलांचे प्रमाण वाढल्याची चिंतनीय माहिती समोर आली आहे. शनिवारी तीन महिला नक्षलवाद्यांना मारण्यात आले. त्याआधी फेब्रुवारी महिन्यातही चार महिला नक्षलवाद्यांना चकमकीत मारले होते. 19 फेब्रुवारी 2025 रोजी बालाघाट पोलिसांनी कान्हा येथील सूपखार वनक्षेत्रातील रौंडा फॉरेस्ट पॅम्पजवळ ही कारवाई केली होती. त्या चार महिला नक्षलवाद्यांच्या शोधासाठी सरकारने एकूण 62 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सन 2015-16 पासून त्या चौघी नक्षल चळवळीत सक्रिय होत्या.



























































