रात्री मटण खावून झोपले; पहाटे अवयव निकामी झाल्याने चौघांचा मृत्यू

मटण खाल्यानंतर अवयव निकामी होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. रायचूर जिल्ह्यातील कल्लूर गावात एका शेतकरी कुटुंबात जोडपे आणि दोन महाविद्यालयीन मुलांचा मटण खाल्यानंतर काही तासांत मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर अवस्थेत आहे. भीमण्णा बागली (60), पत्नी इरम्मा (54) आणि मल्लेशा (19) आणि पार्वती (17) अशी मृतांची नावे आहेत.

अन्नातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज रायचूरचे उपायुक्त नितीश के यांनी व्यक्त केला आहे.

कल्लूर गावातील बागली कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी चपाती, मटण आणि कोशिंबीर खाल्ले. त्यानंतर ते झोपी गेले. मात्र मध्यरात्री सर्व सदस्यांची तब्येत बिघडली. शेजाऱ्यांनी सर्वांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नेले. मात्र पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अनेक अवयव निकामी झाल्याने चौघांचा मृत्यू झाला.

चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कुटुंबाने सेवन केलेल्या अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सिरावर पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच कुटुंबाचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत खुलासा होईल.