मालेगावजवळ ट्रॅव्हल्स-पिकअपच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

मालेगाव-मनमाड रस्त्यावर चोंडी जळगाव येथे सोमवारी मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्स बस व पिकअपचा भीषण अपघात झाला. यात पिकअपमधील मालेगावचे तिघेजण आणि मध्य प्रदेशाचा बस क्लिनर अशा चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर आहेत. मध्य प्रदेशची खासगी ट्रॅव्हल्स बस 20 प्रवाशांना पुणे येथून उज्जैनला घेऊन जात होती. ही बस रात्री दीडच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील चोंडी जळगाव परिसरात पोहोचली, तेव्हा समोरून भरधाव येणारी पुण्याची पिकअप बसवर आदळून भीषण अपघात झाला. मालेगाव तालुका पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. तातडीने पिकअपमधील चौघांसह बस चालक व क्लिनर यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.