गणपतीपुळे समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू, चारजण बचावले

1184

कोल्हापूरहून गणपतीपुळ्यात आलेले सात पर्यटक गणपतीपुळ्यातील समुद्रात पोहायला गेले असताना बुडाले. सातपैकी चौघेजण बचावले असून तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ही घटना आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे किनारपट्टीवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी 12 जीवरक्षक असलेल्या गणपतीपुळ्याचा किनारा आता केवळ दोन जीवरक्षकांवर अवलंबून आहे.

शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूरहून हा नऊजणांचा समूह गणपतीपुळे येथे आला होता. तेथील एका हॉटेलमध्ये त्यांनी वास्तव्य केले आणि आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ते गणपतीपुळे किनार्‍यावर आले. त्या पर्यटकांपैकी सातजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. पोहायला किसन मछले याने आपल्या बरोबरचे सहकारी बुडत असलेले पाहताच एकेकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. सात जणांपैकी किसन मछले, पूजा बागडे, निर्मला मछले, ऐश्वर्या मिणेकर हे चौघेजण बचावले. मात्र इतर तिघेजण पाण्यात बुडाले. काजल रोहन मछले, (17), सुमन विशाल मछले (25, दोघीही रा. कसबा बावडा, कोल्हापूर), उमेश ऊर्फ राहुल अशोक बागडे (28, रा. हुबळी, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या