मीरा-भाईंदर शहराला गेल्या काही दिवसांपासून आवश्यकतेपेक्षा कमी पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक तीव्र पाणीटंचाईने बेजार झाले आहेत. यावर उपाय म्हणून सूर्या प्रकल्पातून वाढीव पाण्याचा कोटा मंजूर होईपर्यंत शहरातील तळ अधिक चार मजल्यावरील इमारतींना नवीन नळ जोडणी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मीरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून 80 द.ल. लिटर व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 125 द.ल. लिटर असा एकूण 205 द.ल. लिटर पाण्याचा कोटा प्रतिदिन मंजूर आहे. प्रत्यक्षात स्टेम प्राधिकरणाकडून 75 द.ल. लिटर व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 117द.ल. लिटर असे सरासरी एकूण 192 द.ल. लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन इमारतीची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
सध्या पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिकेला नागरिकांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरास सूर्या प्रकल्प योजनेंतर्गत 218 द.ल. लिटर पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत बहुमजली इमारती तळ अधिक 4 मजल्यावरील इमारतींना नवीन नळजोडणी मंजुरी देण्यास स्थगिती देण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी आजच्या बैठकीत घेतला.
■ मागणी व पुरवठ्यात तफावत
सध्याच्या शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई दर माणसी 150 लिटर याप्रमाणे शहरास सुमारे 235 द.ल. लिटर प्रतिदिन पाण्याची गरज आहे व प्रत्यक्षात 192 द.ल. लिटर पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत सुमारे 43 द.ल. लिटर प्रतिदिन पाण्याची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत आहे.