वाई बाजार समितीचाच बाजार; संचालकांचे खळबळजनक आरोप

890

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप सरकारने नियुक्त केलेले संचालक प्रदीप क्षीरसागर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. बाजार समितीकडून मागितलेली कोणतीही माहिती मिळत नसून ते अधिकाऱ्यांनाही न जुमानता मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांनाही न्याय मिळत नसल्याने आपण याबाबतची तक्रार उपनिबंधकांकडे केली आहे. त्यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत बांधकाम घोटाळा झाला आहे. बांधकामासाठी मंजुरी मिळालेल्या आराखड्यात बदल करून चार अतिरिक्त गाळे बांधण्यात आले. त्याची विक्री कोणाला आणि कोणी केली याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या चार गाळ्यांच्या विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर रीतीने करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या नियुक्त्या कोणतीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने करण्यात आल्या आहेत. याबाबतची तक्रार क्षीरसागर यांनी केल्यानंतर साताऱ्यातील उपनिंबधकांनी या आरोपांवर तीन महिन्यात खुलासा करण्याचे निर्देश बाजार समितीला दिले आहेत. याबाबत बाजार समितीकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने भ्रष्टाचारी संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई होऊ शकते, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

बाजार समिती गेली 10 वर्ष राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या ताब्यात असून त्यांच्या काळात वाई कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांनी नियुक्ती व वाई कृषिउत्पन्न बाजार समितीच्या गळ्यांचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहेत. या बाजार समितीमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची मान्यता सरकारकडून घेतलेली नाही. अनेक वर्षे शिपाई क्लार्क म्हणून काम करत आहेत. ऐन निवडणूकीच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदारांवर घोटाळाचा आरोप झाल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बाजार समितीत शेतीमालाचा बाजार होतो, त्याच बाजार समितीची बाजार केला की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या