मोफत शिवभोजन थाळी योजनेला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ; आतापर्यंत 90 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लाभ

‘ब्रेक द चेन’ योजनेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते, त्यामध्ये राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

यासंबंधीचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने 17 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे. शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 15 एप्रिल ते 17 जून या काळात 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी 70 लाख 18 हजार 184 थाळ्यांचे वितरण झाले आहे. राज्यात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 441 नवीन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून यामुळे प्रतिदिन थाळ्यांची संख्या 44,300 ने वाढली आहे.

राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्याने मंजूर केलेल्या 441 केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. सध्या राज्यात एकूण 1043 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या