वांद्र्यात साकारले काशी विश्वनाथ मंदिर

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त 52 फूट उंचीचे हुबेहुब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी दररोज असंख्य भक्त गणेशोत्सवाला भेट देत आहेत.

श्री काशी विश्वनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसीत गंगा नदीच्या तीरावर आहे. मुगली आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक शतकांनंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले.

या मंदिराचा कळस, वैशिष्टय़पूर्ण असलेले खांब, विश्वेश्वराची पिंडी या सगळ्याची हुबेहुब प्रतिकृती गणेशोत्सवात साकारली आहे. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षीचे 30 वे वर्ष आहे. भाजप आमदार अॅड. आशीष शेलार हे मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवात एका प्रसिद्ध मंदिराची आरास केली जाते. गेल्या वर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर, त्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर, केदारनाथ मंदिर, पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई समाधी मंदिर, लोकामान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाडय़ाची प्रतिकृती साकारण्यात आली होती.