
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेनेने पुकारलेल्या ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलनाचा वणवा आज देशभरात पसरला. मोदी सरकारच्या विरोधात देशात संतापाची तीव्र लाट उसळली. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. महाराष्ट्राच्या घराघरातून जमा केलेले कुंकू, ओटय़ा आणि बांगडय़ांची हजारो पार्सल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली. त्याच वेळी शिवसैनिकांनी टीव्ही फोडले आणि बॅट तोडून संताप व्यक्त केला. राष्ट्रभक्त जनतेने या सामन्यावर बहिष्कार टाकला. दरम्यान, त्यामुळे दुबईतील क्रिकेट स्टेडियमही सामन्या वेळी अर्धे रिकामेच होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आधीच विरोध दर्शवला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याविषयी भूमिका मांडली. त्यांच्या ठाम भूमिकेचे प्रतिध्वनी आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभरात उमटले. आम आदमी पक्ष व एमआयएमनेही हीच भूमिका मांडत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. तिरुवअनंतपुरममध्ये शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. दिल्लीत मंगतराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आंदोलन केले.
अहमदाबाद, वडोदरा, दिल्ली, बंगळुरूतही आंदोलन
देशातील अनेक राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. आम आदमी पक्षाने दिल्ली व चंदिगडमध्ये जोरदार आंदोलन केले. अहमदाबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने निदर्शने केली. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी मोदी सरकारचा धिक्कार केला.