एअर इंडियाच्या बोइंग विमानाचा इंधन स्विच दोन वेळा पडला बंद, सुदैवाने अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनमध्ये एअर इंडियाच्या बोइंग 787-8 विमानाचा इंधन स्विच दोन वेळा आपोआप बंद पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे विमान ताफ्यातून हटवण्यात आले. इंधन स्विच बंद पडल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यामुळे गेल्या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातासारखी घटना टळली.

प्राप्त माहितीनुसार, लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून बोइंग 787-8 ड्रीमलायनर हे विमान 200 प्रवाशांना घेऊन बंगळुरू येथे आज सकाळी पोहोचले. मात्र इंधन स्विच नेमका कधी बंद पडल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. एअर इंडियाने या घटनेची माहिती ‘डीजीसीए’ला दिली आहे. विमानात झालेल्या बिघाडाच्या तपासासाठी विमान उत्पादक कंपनीला सहभागी करून घेण्यात आले आहे.

इंजिन सुरू करताना स्विच बंद पडल्याचा दावा

इंजिन सुरू करताना दोन वेळा इंधन स्विच अचानक बंद पडल्याचा दावा सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन या संस्थेने केला आहे. डाव्या बाजूच्या इंजिनाला इंधन पुरवठा करणारा हा स्विच होता. अशा प्रकारच्या बिघाडामुळे कोणत्याही क्षणी अचानक इंजिन बंद पडू शकते. असाच प्रकार 12 जून रोजी अहमदाबाद येथील विमान अपघातासाठी कारणीभूत ठरला होता.