फरार बुकी अनिल जयसिंघानीला अटक; गुजरातच्या गोध्रामधून उचलले

गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला बुकी अनिल जयसिंघानी  अखेर मुंबई पोलिसांच्या हाती लागला. सतत जागा बदलून राहणाऱया अनिल जयसिंघानीला पोलिसांनी रविवारी रात्री गुजरातच्या गोध्रा येथे पकडले. याआधी पोलिसांनी त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न करून धमकावल्या प्रकरणी अटक केली आहे.

16 तारखेला अनिक्षाला पकडण्यात आले तेव्हा अनिल मीरा रोडमध्ये होता. मुलीला पोलिसांनी पकडल्याचे कळताच त्याने मीरा रोड सोडून गुजरात गाठले.

बेटिंगच्या कारभारात सक्रिय

अनिल जयसिंघानी देशाबाहेर पळून जाऊ नये याकरिता मुंबई पोलीस आणि ईडीकडून त्याच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आली होती. परंतु असे असतानाही अनिल देशातच होता. तो महाराष्ट्रातही राहत होता.  पकडला जाईपर्यंत अनिल जयसिंघानी बेटिंगच्या कारभारात सक्रिय होता असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.