पंढरपूरमध्ये चितेच्या राखेतून सोन्याची चोरी

893

पंढरपूरमध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर चितेची राख चोरून त्यातील सोने चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरच्या वैकुंठ स्मशानभूमीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी साधना राऊत यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सोने चोरीची तक्रार दाखल केली आहे.

सुंदराबाई दिगंबर राऊत (वय 75) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चंद्रभागा नदीच्या तीरावरील सार्वजनिक वैकुंठ स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर चार ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र आणि चांदीचे जोडवे होते. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी माती सावडण्याचा विधी करण्यासाठी नातेवाईक गेले असता अंत्यविधी केलेल्या ठिकाणी चितेची राखच गायब झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने मृताची राख चोरुन नेल्याने राऊत कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा अशी मागणी मृत सुंदराबाई यांची सून साधना राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक दयानंद गावडे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या